सध्या केरळमध्ये एन्डोसल्फान या कीटकनाशकावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. तेथे काजूच्या प्लांटेशनवर तसेच इतर काही पिकांवर एन्डोसल्फान फवारले जाते. केरळमधील कासरगोड जिल्ह्यात तर त्याचा वापर खूपच जास्त आहे. एन्डोसल्फान हे अतिशय विषारी कीटकनाशक असूनही त्याचा बेदरकार वापर केल्याने संबंधित गावातील अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अमेरिका व युरोपच्या निकषानुसार हे कीटकनाशक खूपच हानिकारक आहे. या कीटकनाशकामुळे केरळात आतापर्यंत ५०० लोक प्राणास मुकले असून पाच हजार लोकांमध्ये जनुकीय विकृती आल्या आहेत. एन्डोसल्फान हे ऑर्गनोक्लोरिन गटातील कीटकनाशक असून त्याचा उपप्रकार सायक्लोडाईन हा आहे. १९५० च्या सुमारास त्याचा वापर सुरू करण्यात आला. स्पर्श किंवा पोटात गेल्याने त्याची विषबाधा होते. भाज्या, फळे, कापूस, तांदूळ, काजू, चहा, कॉफी, तंबाखू या सर्व पिकांवर ते फवारले जाते. वाळवी लागू नये म्हणून लाकडावरही त्याचा वापर होतो. सी-९ एच-६ सीएल ६ ओ ३ एस असे त्याचे रासायनिक सूत्र आहे. शुद्ध स्वरूपात ते रंगहीन पावडरच्या रूपात असते तर संयुगाच्या रूपात ते तपकिरी रंगाचे स्फटिक असतात, त्याला सल्फर डायॉक्साईडचा वास असतो. एन्डोसल्फान हे अल्फाएन्डोसल्फान व बीटा एन्डोसल्फान या दोन आयसोमरचे मिश्रण असते. एन्डोसल्फान पाण्यात फार थोडे विरघळते. झायलिन, क्लोरोफॉर्म, केरोसिन यात ते सहज विरघळते. जवळपास सर्वच प्रगत देशात या कीटकनाशकावर बंदी आहे. एन्डोसल्फान हे हवेत फवारले जाते त्यामुळे ते श्वासातून, पाण्यातून, अन्नातून मानवी शरारीत प्रवेश करते. सिगरेटमध्ये जी तंबाखू वापरतात त्यातही ते असू शकते. डीडीटीवर बंदी आल्यानंतर एन्डोसल्फानचा वापर वाढला. एन्डोसल्फानमुळे त्वचेची आग होते, श्वास घेणे कठीण जाते डायरिया, अॅनिमिया, उलट्या, निद्रानाश असे अनेक परिणा दिसतात. अनेकदा गुणसूत्रात बदल होऊन जन्मजात विकृत येते. स्त्रियांमध्ये एस्ट्रोजेनचे प्रमाण वाढून स्तनाचा कर्करोग होतो. पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाणही वाढते. मूत्रपिंड व वृषणांची हानी होते. माशांसारख्या जलचरांवरही त्याचा परिणाम होतो. कासरगोड जिल्ह्यातील जैवविविधता या कीटकनाशकामुळे ४० ते ७० टक्के कमी झाली आहे. कर्नाटकातही या कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर हो आहे. भारतात एन्डोसल्फानचे उत्पादन वर्षाला ९ हजार टन आहे. देशातच त्यातले ७० टक्के वापरले जाते. जगात या कीटकनाशकाला १३४० कोटी रुपयांची बाजारपेठ आहे, त्यामुळे त्यावर बंदी घालण्यास केंद्राची कुचराई चालू आहे. कासरगोड व इतर काही विशिष्ट ठिकाणी या कीटकनाशकामुळे चिंताजनक परिस्थिती आहे.